10 AUG

कळसुबाई शिखर चढण्याचा एक थरारक अनुभव

मिलिद मधुकर जाधव. 15 Comments
खरं तर कळसुबाई शिखर सर करण्याची माझी ही दुसरी वेळ मात्र भारतमातेच्या प्रजासत्ताकदिनी शिखरावर तिरंगा फडकवण्याचं ऊराशी बाळगलेलं स्वप्न सन्माननीय आनंद बनसोडे यांच्या ३६० एक्स्प्लोरर संस्थेच्या माध्यमातून पूर्ण झालं.त्यामुळे आनंद सर आणि सर्व साथीदारांचे मनपूर्वक आभार. निसर्गाच्या सानिध्यात मनसोक्त भटकणं हा माझा आवडता छंद आणि यातूनच वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे साक्षीदार असलेल्या गडकोटांच्या काही धाडसी मोहीमांसह महाराष्ट्र देशीच्या साठपेक्षा जास्त गडदुर्गांना भेट देण्याचं भाग्य मला मिळालं. वास्तविक प्रत्येक मोहीमेचा अनुभव,थरार आणि वैशिष्टय हे वेगळं असतं.प्रत्येक मोहीमेत नवे साथीदार असले तरी दऱ्याखोऱ्यातल्या अनवट रानवाटा तुडवत काळ्याभिन्न,अजस्त्र आणि राकट,कणखर सह्याद्रीशी नातं सांगताना आकाशाला कवेत घेण्याची उर्मि तर सर्वांमधे सारखीच असते.या उर्मितुनच मग ३६० एक्स्प्लोरर च्या शिलेदारांनी कळसुबाईचं सर्वोच्च शिखर सर करून संविधान वाचनाचा एक दिमाखदार सोहळा साजरा केला. या सोहळ्यामधे आंतरराष्ट्रीय धावपटू ओमकार स्वामी सोलापूर पोलिस दलातील संतोष वाघमारे , सिद्धराम देशमुख,निलेश शिरूर ,तज्ञ डॉक्टर मित्र आणि इतर सर्वजण आपलं वेगळेपण बाजूला ठेवून एकमेकांशी समरस झाले त्यामुळे सारे भारतीय माझे बांधव आहेत या उक्तीचा प्रत्यय आला.दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आपल्याला दोन वर्षापासून ते पंधरा वीस वर्षापर्यंतची मूलं मोबाईल हेच आपलं सर्वस्व मानून त्यामधे आकंठ बुडालेली दिसतात मात्र परी,अक्षन', आद्या',मोनीका,सुमीत यासारख्या छोट्या मुलांना या मोहीमेत सहभागी करून पालकांनी आपलं पालकत्व खऱ्या अर्थाने सिद्ध केलं आहे.त्यामुळे पालकांचं आणि चिमुकल्यांच मनापासून अभिनंदन. कारण अशी मूलच आपला इतिहास आणि शौर्यशाली परंपरा निश्चितपणे पुढे नेतील. या मोहीमेमधे शिखरावर पोहोचणे आणि सुरक्षितपणे पायथ्याला येणे जसे महत्त्वाचे टप्पे होते त्याबरोबरच कोकणातुन पुण्यात आल्यावर पुण्याहून बारी आणि बारीहुन पुन्हा पुणे या साधारण चारशे किलोमीटरचा दुचाकीवरचा खडतर प्रवास हा माझ्यासाठी थरारक अनुभव होता.या प्रवासामधे मी चाकणचा संग्रामदुर्ग आणि जुन्नर तालुक्यातल्या नारायणगड या किल्ल्यांना भेट दिली.एकंदरीत वेगवेगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे ही मोहीम माझ्या सदैव स्मरणात राहील. अशी ही संस्मरणीय मोहीम मी देशासाठी शहीद झालेल्या जवानांच्या पवित्र स्मृतीला आणि समस्त जनतेच्या पोटाची भुक भागवण्याचा प्रयत्न करताना नापिकी,नैसर्गिक आपत्ती आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केलेल्या बळीराजाच्या स्मृतीला त्याबरोबरच काही दिवासापूर्वीच आपल्यातून अचानकपणे निघून गेलेले जेष्ठ गिर्यारोहक श्री.अरूण सावंत यांच्या पवित्र स्मृतीला विनम्रपणे अर्पण करत आहे. या मोहीमेमधे सहभागी झालेल्या सर्व साथीदारांचे आणि आपली क्षुधाशांती करणाऱ्या बाळू घोडे यांच्यासह आनंद सर तुमच्या सदाहरित हसमुख नेतृत्वाला त्रिवार सलाम. .

धन्यवाद

मिलिद मधुकर जाधव.

User Comments

360 Explorer

Reply 1 year Ago

Thank you

Leave A Comment